spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत मनपातर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर, ता. ९ : नागपूर महानगरपालिकेचे अमृत महोत्सवी वर्ष व केंद्र शासनाच्या “हर घर तिरंगा” अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले. स्वातंत्र्यदिनापर्यंत शहरातील विविध भागांमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत.

केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानात 15 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या विशेष अभियानात शहरातील विवेकानंद स्मारक, अंबाझरी, सक्करदरा उड्डाण पूल, संविधान चौक, विविध उद्याने, फ्रिडम पार्क गार्डन, सुरेश भट सभागृह, मनपाच्या इमारती, यशवंत स्टेडियम, मेट्रो, सिव्हिल लाईन विधान भवन अशा सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रकाश योजना व आकर्षक अशी सजावट करण्यात येणार आहे. याशिवाय घरोघरी तिरंगा उपलब्ध होण्यासाठी मनपाचे सर्व  झोन कार्यालयात बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा विक्री व वितरण करण्यात येणार आहे.

येत्या 10 ऑगस्ट रोजी विविध शाळा आणि महाविद्यालय, सांस्कृतिक सभागृह, नाट्यगृहात तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे तिरंगा गीत या कार्यक्रमात  गायले जाईल. येत्या 11 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा या अभियानात नागपूर महानगरपालिकेतर्फे फ्रिडम पार्क झिरो माईल येथे तिरंगा कॅनव्हॉसवर नागरीकांना देशभक्तीच्या संदर्भात विविध घोषणा लिहिण्याची संधी मिळेल.  तर येत्या 12 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा या अभियानात सिव्हील लाईन्स भागातील रामगिरी येथून तिरंगा मॅरेथॉन दौड काढली जाणार आहे.  याच दिवशी तिरंगा ट्रिब्यूट या कार्यक्रमाअंतर्गत वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्था (मॉरीस कॉलेज) येथे  स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद जवानांचे स्मरण करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र् सैनिक, वीर नारी तसेच सैन्यातील कार्यरत जवान यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात येणार आहे.

12 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत नागपूर महानगरपालिकेतर्फे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील आंबेडकर उद्यान, मध्य नागपूर  विधानसभा मतदारसंघातील चिटणीस पार्क, दक्षिण-पश्चिम नागपूरमधील अजनी चौक, पश्चिम नागपूर येथील फुटाळा तलाव, दक्षिण नागपूर येथील ज्ञानेश्वर उद्यान व उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील झुलेलाल पार्क येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा सेल्फी पॉईंट ठेवण्यात येणार आहे. हर घर तिरंगा संकेतस्थळावर सेल्फीज छायाचित्रे अपलोड केल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येत विविध उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.  

Popular Articles