– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फे जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाला पर्यायी वाद निवारण (एडीआर) प्रात्यक्षिक प्रशिक्षण भेट
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा न्यायालय, नागपूर येथील राष्ट्रीय लोक अदालतीला तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला भेट दिली. पर्यायी वाद निवारण (एडीआर) या विषयातील प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा भाग म्हणून ही भेट आयोजित करण्यात आली होती. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांच्या परवानगीने सुमारे १०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या प्रत्येक पॅनलशी संवाद साधला. लोक अदालत कशी कार्य करते, प्रकरणे कशी निकाली काढली जातात आणि निवाडा व तडजोड यांतील फरक याबाबत पॅनलने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांच्याशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. यावेळी जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्या. प्रवीण उन्हाळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अन्वये चोरीची प्रकरणे, पैसे वसुलीचे दावे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संबंधित नुकसान भरपाईची प्रकरणे तसेच मोटार अपघात नुकसान भरपाईच्या दाव्यांवरील कामकाज प्रत्यक्ष पाहिले. दिवसभरात निकाली निघालेल्या प्रकरणांच्या नोंदी व कागदपत्रांचीही त्यांनी पाहणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे संचालक डॉ. रविशंकर मोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. प्रविणा खोब्रागडे व डॉ. अधरा देशपांडे यांच्या सहकार्याने ही भेट पार पडली. भेटीच्या समन्वयक दर्शना मलानी यांच्यासह अॅड. संजय ब्रह्मे, अॅड. रमण चिमूरकर, अर्चना प्रांजळे, डॉ. चिन्मयी निंबखेडकर, शिखा गुप्ता, अॅड. मृणाल एस. हिवसे, अॅड. गार्गी व्ही. चौबे, अॅड. राजलक्ष्मी झोडे आणि श्री. प्रजासत्ताक गजभिये या प्राध्यापकांनी दिवसभर विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहून त्यांना सहकार्य केले.





