– शासकीय इतमामात शहीदांना श्रद्धांजली; शहीद कुटुंबीयांचा सन्मान, स्व. शामू शरणागते यांच्या कुटुंबास २ लाखांची मदत आणि सुमारे १०० युनिट रक्तदान
नागपूर :- वन, वन्यजीव व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या वन बलिदानाला अभिवादन करण्यासाठी १४ वा राष्ट्रीय वन शहीद दिन शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी, नागपुरात अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वनभवन, नागपूर परिसरातील वन शहीद स्मारकावर आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात शासकीय इतमामात वन शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रधान वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख श्रनिवास राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक गौड तसेच अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाला अखिल भारतीय वन अधिकारी महासंघ, नवी दिल्लीचे चेअरमन दिग्विजय सिंह, राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मिश्रा, संस्थापक सुभाष डोंगरे, वरिष्ठ उपाध्यक्ष नागेंद्र बाबू, महासचिव जगबंधू पात्रा यांच्यासह विविध राज्यांमधून आलेले प्रांतीय अध्यक्ष, पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच फॉरेस्टर अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशन ठाणे (महाराष्ट्र) चे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र भदाणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, तसेच सेवानिवृत्त संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेळके यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले वन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शद्धांजली कार्यक्रमा नंतर अखिल भारतीय वन अधिकारी महासंघ, नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली फॉरेस्टर अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशनच्या ऑफिसर्स क्लबच्या लॉनमध्ये वन शहीद कुटुंबीयांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व शहीद कुटुंबीयांना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, दुय्यम संवर्ग गुरुप्रसाद साहेब यांच्या हस्ते शाल, श्रफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गोंदिया वन्यजीव विभागात नुकत्याच झालेल्या हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेले माजी सैनिक वनरक्षक स्व. शामू शरणागते यांच्या कुटुंबीयांना संघटनेच्या वतीने २ लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
१०० युनिट रक्तदान करून शहीदांना श्रद्धांजली
वन शहीद दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये वन अधिकारी व कर्मचार्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सुमारे १०० युनिट रक्तदान केले. वन शहीदांच्या अखिल भारतीय वन अधिकारी महासंघाच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्रमासोबतच अखिल भारतीय वन अधिकारी महासंघ, नवी दिल्ली यांच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मिश्रा होते. महासचिव जगबंधू पात्रा यांनी देशभरातील वनरक्षक, वनपाल व वनक्षेत्रपाल यांच्या विविध समस्या तसेच त्यांच्या हिताशी संबंधित विविध विषय सभेसमोर मांडले. महासंघाची आगामी कार्ययोजना व संघटनेची पुढील दिशा याबाबतही आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात आले. या प्रस्तावांवर उपस्थित १५ राज्यांतील सविस्तर व सकारात्मक चर्चा केली. आवश्यक सुधारणांसह सर्व प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
वन शहीदांचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील-शैलेंद्र भदाणे
कार्यक्रमाला संबोधित करताना फॉरेस्टर अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशन ठाणाचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र भदाणे यांनी सांगितले की, वन शहीदांचे बलिदान संपूर्ण वन विभागासाठी सदैव स्मरणीय राहील.
ते म्हणाले की, १३ वा राष्ट्रीय वन शहीद दिन ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी १४ वा राष्ट्रीय वन शहीद दिन महाराष्ट्रात आयोजित करण्याची जबाबदारी महाराष्ट्राला सोपविण्यात आली होती. वनबल प्रमुखांसोबत झालेल्या बैठकांमधून कार्यक्रम शासकीय इतमामात आयोजित करण्याचा प्रस्ताव वन प्रशासनासमोर मांडण्यात आला. वन प्रशासनाने सकारात्मक पुढाकार घेत हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत तत्कालीन वनमंत्री गणेश नाईक यांचीही भेट घेतली. त्यानंतर शासनाच्या वतीने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ३८.२० लाखांच्या अनुदानास मंजुरी कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती भदाणे यांनी दिली. यानंतर वनबल प्रमुखांनी वनसंरक्षक, नागपूर यांना पत्र देऊन संघटनेच्या सहकार्याने कार्यक्रमाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
वन प्रशासन व संघटनेच्या संयुक्त प्रयत्नांतून कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. मात्र कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात तो ’होल्ड’ वर ठेवण्याचे निर्देश मिळाल्याने आयोजना बाबत असमंजसाची निर्माण झाली. संघटनेच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ अधिकारी तसेच वनमंत्र्यांची भेट घेऊन कार्यक्रम थांबविण्या मागील कारणांबाबत सातत्याने पाठपुरावा केला. भदाणे यांनी सांगितले की, वन शहीदांच्या सन्मानाचा कार्यक्रम राजकीय स्वरूप देऊन त्याला विरोध करण्याची प्रवृत्ती दुर्दैवी आहे. वन शहीदांचा सन्मान कोणत्याही राजकीय वादापेक्षा शेष्ठ आहे.
महाराष्ट्रातील वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल तसेच सर्व वन अधिकारी- कर्मचार्यांच्या सहकार्याने संघटनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज हजारो वन अधिकारी-कर्मचार्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. वन शहीदांच्या कार्यक्रमाला राजकीय रंग देणार्या मानसिकतेचा निषेध करत त्यांनी सर्व वन कर्मचारी संघटनांना आपापले मतभेद बाजूला ठेवून वन शहीद कुटुंबीयांच्या सन्मानासाठी व कल्याणासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. वन शहीदांची स्मृती सदैव जपण्याचा संकल्प यावेळी विविध राज्यांतून आलेल्या वन अधिकारी- कर्मचारी प्रतिनिधींनी वन शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहण्याचा तसेच वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाचे आपले कर्तव्य अधिक निष्ठेने पार पाडण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणारे वन प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, विविध वन कर्मचारी संघटना, महासंघाचे पदाधिकारी, देशभरातून आलेले प्रतिनिधी, रक्तदाते तसेच सर्व सहकार्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. महासंघाच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाचे संचालन पंकज पांडे यांनी केले, तर आभार फॉरेस्टर अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र भदाणे यांनी मानले.





