– आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते पारडसिंगा येथे भव्य रोपटे वाटप कार्यक्रम
पारडसिंगा :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘सेवा सप्ताहा’ अंतर्गत काटोल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘एक पेड अपनी माता और पिता के नाम’ या उपक्रमाच्या माध्यमातून रोपट्यांचे वाटप करण्यात आले. आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या आई स्व. राजदुल्हारी ठाकूर व वडील स्व. बाबूलालजी ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री सती अनुसया माता संस्थान, पारडसिंगा येथे या भव्य रोपटे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार चरणसिंग ठाकूर म्हणाले, “आई-वडिलांच्या स्मृती जपण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे त्यांच्या नावाने एखादे झाड लावून त्याचे संगोपन करणे. आज आपण लावलेले हे रोपटे भविष्यात मोठे वृक्ष बनेल आणि आपल्या पुढील पिढ्यांना सावली, प्राणवायू व समृद्ध पर्यावरण देईल. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन गावागावांत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करावी.” ते पुढे म्हणाले की, पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्या गावांचा परिसर हिरवागार करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. काटोल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना रोपट्यांचे वाटप करून गावागावांत वृक्षलागवडीला चालना देण्यात आली. “आजचे रोपटे म्हणजे उद्याच्या समृद्ध आणि हरित भविष्याची पायाभरणी आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती, काटोलचे संचालक नितीन डेहनकर, किशोर गाढवे, चंद्रशेखर चिखले, रुपेश तातोडे, जलालखेडा मंडळ अध्यक्ष अक्षय विरखेडे, मयूर दंढारे तसेच काटोल तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावागावांत पोहोचवून अधिकाधिक वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.





