spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

यवतमाळचा योगासन खेळात राष्ट्रीय पातळीवर झेंडा!

– राज्यस्तरीय स्पर्धेत विजू राठोडचा द्वितीय क्रमांक राष्ट्रीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड

यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे. यवतमाळचा युवा योगपटू विजू राठोड याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. यवतमाळच्या योगासन क्षेत्रातील हा एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण मानला जात आहे.

10 ते 12 सप्टेंबर 2026 दरम्यान सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे ही राज्यस्तरीय योगासन स्पर्धा पार पडली. योगासन भारतशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग परिषद तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 500 हून अधिक योगपटूंनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत विजू राठोड याने आपल्या कौशल्यपूर्ण, अचूक आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने द्वितीय क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेतील स्थान पक्के केले.

विजूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड यवतमाळ येथील उबंटू इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर झाली होती. जिल्हास्तरावर मिळविलेल्या यशाचे रूपांतर त्याने राज्यस्तरावरही दमदार कामगिरीत केले आणि आता त्याने राष्ट्रीय स्तरावर यवतमाळचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.

विजूच्या या यशामागे त्याचे कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, सातत्य आणि आई-वडिलांचा आशीर्वाद, तसेच यवतमाळ जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे.

विजू राठोड हा नेहरू महाविद्यालय, नेर येथील विद्यार्थी असून त्याला महाविद्यालयाचे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ. वशिष्ठ खोडसकर, तसेच यवतमाळ जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे डॉ. साहेबराव साखरे, प्रेमदास पकडे, रूपाली शिंदे ,सतीश उपरे, यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विजूच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक करत मार्गदर्शकांनी “राष्ट्रीय स्तरावरही विजूने सुवर्णपदक मिळवून यवतमाळचा मान उंचवावा,” असा विश्वास व्यक्त केला आहे. विजूचे ध्येय आता राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करत यवतमाळच्या नावाची राष्ट्रीय पातळीवर चमक निर्माण करण्याचे आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेतून यशस्वीपणे परतल्यानंतर विजू राठोडचे यवतमाळ येथे यवतमाळ जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष दर्शन जाजू, उपाध्यक्ष पांडुरंग खांदवे, डॉ. साहेबराव साखरे, सचिव प्रेमदास पकडे , सहसचिव सतीश उपरे, संघटक सचिव  रूपाली शिंदे, शिला साखरे, विश्वजीत इंगोले,  क्रांती अलोणे आदींनी विजूचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यवतमाळ जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावर योगासन स्पर्धेसाठी स्वतःची जागा निश्चित करणारा विजू राठोड हा पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे यवतमाळच्या योगासन क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.