– आमसभेच्या निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ‘नवचेतना शिबिरा’चे आयोजन; समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन
नागपूर :- हलबा समाज महासंघ, नागपूरची ५१ वी वार्षिक आमसभा रविवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता, हलबा समाज महासंघ सांस्कृतिक भवन, दीनदयाल नगर, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. महासंघा च्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेनुसार, निर्धारित वेळेस गणपूर्तीअभावी आमसभा तहकूब झाल्यास त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर, म्हणजेच सकाळी १०.३० वाजता, पुन्हा सभा सुरू होईल. यावेळी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे समाजातील सर्व सभासदांनी आमसभेला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. आमसभेच्या निमित्ताने ‘नवचेतना शिबिर’ या आमसभेच्या निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंग, नागपूर यांच्या सहकार्याने ‘नवचेतना शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी, सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत हलबा समाज महासंघ सांस्कृतिक भवन, दीनदयाल नगर, नागपूर येथे होणार आहे.‘ज्ञान-ध्यान-गान’ या संकल्पनेवर आधारित या शिबिरामध्ये तणावमुक्त जीवन, आत्मविश्वास व सर्जनशीलता वाढविणे, मानसिक शांतता व एकाग्रता सुधारणे, कौशल्य विकास तसेच निरोगी जीवनशैली यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या उपक्रमातून सहभागी नागरिकांना व्यावहारिक ज्ञान, श्वसन व ध्यानाच्या तंत्रांचा अनुभव आणि जीवनात सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा मिळणार आहे.
श्री श्री रविशंकर यांच्या विचारांनी प्रेरित या शिबिराचा लाभ समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. “स्वस्थ मन शांत मन आनंदमय जीवन” या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हलबा समाज महासंघाचे अध्यक्ष प्रोपेसर डॉ.देवराम नंदनवार आणि महासचिव डॉ.रमेश पराते यांनी केले आहे. असे हलबा महासंघाचे सल्लागार डॉ.अनिल नंदनवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.





