भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे बुधवार 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या (मुंबई आणि पुणे) एकदिवसीय धार्मिक आणि आध्यात्मिक दौऱ्यावर येणार आहेत. गणेशोत्सवाच्या या शुभप्रसंगी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यातील विविध प्रमुख गणेशोत्सव मंडळ आणि मंदिरांना भेट देऊन विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाचे दर्शन आणि पूजा करतील. या प्रसंगी नबीन हे संपूर्ण देशाच्या व राज्यातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतील.
नबीन यांचे आज, बुधवार, 16 सप्टेंबर रोजी सकाळी 10:20 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे . विमानतळावरून, नबीन हे थेट ऐतिहासिक श्री सिद्धिविनायक मंदिराकडे जातील. तिथे ते भगवान श्री गणेशाचे दर्शन घेऊन विधीवत पूजा करतील.
त्यानंतर, सकाळी 11:30 वाजता, ते भगवान गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रसिद्ध ‘लालबागच्या राजा’ मंडपाला भेट देतील.
दुपारी 12:00 वाजता, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष मलबार हिलवरील माननीय मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. तेथील भगवान श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर, ते विघ्नहर्त्याचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी मलबार हिलवरीलच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानांना भेट देतील.
नबीन दुपारी 2:15 वाजता वांद्रे रिक्लमेशन येथील श्री गणेशाचे दर्शन घेतील. मुंबईतील या कार्यक्रमांनंतर नबीन पुण्याकडे प्रस्थान करतील.
पुण्यात पोहोचल्यावर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष थेट कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
त्यानंतर, सायंकाळी 5:00 वाजता, नबीन पुण्यातील जगप्रसिद्ध ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत.’
सायंकाळी 5:30 वाजता, ते सदाशिव पेठ येथील ‘साने गुरुजी तरुण मित्र मंडळाच्या श्री गणेशाचे पूजा करतील. यानंतर, ते कोथरूड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत .





