spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धम्मप्रचारात कवी-गायकांचे योगदान अतुलनीय – भदंत नाग दीपंकर

– कविवर्य सदानंद नारनवरे यांच्या १५ व्या स्मृतीदिनी ‘मायेची सावली आई रुखमिणी स्मृतीगंध पुस्तकाचे प्रकाशन 

कामठी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तथागत बुद्धांचा विश्वविख्यात धम्म जनसामान्यांच्या घराघरांपर्यंत आणि मनामनांपर्यंत पोहोचवण्यात कवी व गायकांची भूमिका ऐतिहासिक राहिली आहे. या चळवळीत कविवर्य सदाशिवराव (सदानंद) नारनवरे यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, असे विचार पूज्य भदंत नाग दीपंकर यांनी व्यक्त केले.

बुद्ध धम्म प्रचारक आदर्श कवी मंडळ, नागपूर आणि सदानंद भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श धम्म प्रचारक केंद्र, येथे कविवर्य सदानंद नारनवरे यांच्या १५ व्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लेखक बंडू नारनवरे यांनी शब्दांकित केलेल्या “मायेची सावली आई रुखमिणी” या स्मृतीगंध पुस्तकाचे प्रकाशन भदंत नाग दीपंकर यांच्या पावन हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना भदंत नाग दीपंकर पुढे म्हणाले की, “कविवर्य सदाशिवराव नारनवरे अल्पशिक्षित असूनही त्यांनी गावकुसातील व्यथा, वेदना आणि अन्यायाचे चटके पचवून आपल्या लेखणीला धार दिली. लोकभाषेत रचिलेल्या विद्रोही व प्रबोधनपर काव्यातून त्यांनी गावागावांत जनजागृतीची मोठी लाट निर्माण केली. अंधश्रद्धा, अज्ञान आणि कुप्रथांच्या अंधकारातून समाजाला बाहेर काढत त्यांनी सत्य, स्वाभिमान आणि न्याय-हक्कांचे धडे दिले. आदर्श कवी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कवी-गायकांना संघटित करून धम्मप्रचाराची धुरा सांभाळली. त्यांची प्रखर वक्तृत्वशैली, चाणाक्ष बुद्धिमत्ता आणि नैतिक मूल्यांची बांधिलकी आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी रवींद्र बोरकर हे होते. कार्यक्रमाला प्रकाश लांजेवार, भाऊराव गोंडोळे, रामदास तागडे, सुधाकर पाटील, पुंडलिक मेश्राम, राहुल निकोसे, मनोहर जामगडे, मिलिंद पाटील, महिपाल मडके, सविता नारनवरे, भीमराव बागडे, वैशाली बागडे, रंजना नारनवरे, तारा घोडेस्वार, सुनंदा रामटेके, विशाखा फुलझेले, शारदा दुपारे, त्रिरत्न मडके प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन महिपाल मडके आणि आभार प्रदर्शन भाऊराव गोंडोळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व त्रिशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या विविध शाखांमधील कलावंतांनी प्रबोधनात्मक भजन व भीम-बुद्ध गीतांचे प्रभावी गायन सादर केले. या सोहळ्यास कामठी, कुही, सावनेर, खापरखेडा, वाचोली, टेंभुरडोह, काचुरवाही, विचवा, सावरमेंढा, चिंचोली, परसोढी आदी भागांतील पदाधिकारी, कवी, शाहीर, गायक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.