वर्धा :- महावितरणच्या वर्धा मंडळाअंतर्गत वर्धा विभागामध्ये भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त ‘अभियंता दिन’ अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. तंत्रज्ञान, विकास आणि राष्ट्रउभारणीत अभियंत्यांचे योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वर्धा मंडलच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा येथील उपकार्यकारी अभियंता महेश मोकुलकर उपस्थित होते. याप्रसंगी वर्धा मंडळाच्या कार्यकारी अभियंता (प्रशासन) शर्मिला इंगळे आणि वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नरेश पारधी यांनी महान अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाचा आढावा घेतला. तसेच आजच्या आधुनिक युगात वीज आणि पायाभूत सुविधा पुरवताना अभियंत्यांसमोर असणारी आव्हाने व त्यांचे कर्तव्य यावर त्यांनी प्रकाश टाकला.
या सोहळ्यात वर्धा विभागातील अभियंत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याचबरोबर, शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवून विभागाची मान उंचावणाऱ्या उपकार्यकारी अभियंता प्रेमकुमार तेलरांधे आणि सहाय्यक अभियंता संदीप कारेमोरे यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल ‘पीएच.डी.’ (Ph.D.) ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी महेश मोकुलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अत्यंत प्रेरणादायी भाषण दिले. “दैनंदिन कामकाजात येणारा ताणतणाव कसा कमी करावा आणि कार्यक्षमता न गमावता सकारात्मक मानसिकतेने काम कसे करावे,” याविषयी त्यांनी विविध व्यावहारिक टिप्स व उपयुक्त माहिती दिली. या प्रसंगी उपस्थित अभियंत्यांनीही आपली मनोगते व्यक्त करत कामातील अनुभव, आव्हाने आणि यशाच्या गाथा उपस्थितांसमोर मांडल्या.
कार्यकारी अभियंता (प्रशासन) शर्मिला इंगळे यांनी आपल्या मनोगतातून सर्व अभियंत्यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात स्मिता पारखी यांनी सांगितले की, “कामाचा वाढता व्याप आणि आव्हाने पेलताना अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. ताणविरहित वातावरण निर्मिती करून टीमवर्कच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा प्रदान करावी.”
यावेळी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करत सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘सुरक्षा प्रतिज्ञा’ घेतली. सुरक्षेच्या या निष्ठेने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मांडवकर यांनी केले, तर आभार कमलेश काळे यांनी मानले. या सोहळ्याला वर्धा विभागातील मोठ्या संख्येने अधिकारी, अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.
आर्वी, हिंगणघाट विभागीय कार्यालयात अभियंता दिनाचे आयोजन
महावितरणच्या आर्वी आणि हिंगणघाट विभागात देखील अभियंता दिनाचे आयोजन करण्यात अले. याप्रसंगी अभियंत्यांचा विशेष गौरव करण्यात येऊन त्यांना ताणविरहित काम करण्याबाबत मौलीक मार्गदर्शन करण्यात आले.





