– दहा हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ; रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :- उमरेड मार्गावरील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने श्रींचा ११६ वा संजीवन समाधी दिन, पुण्यतिथी व ऋषिपंचमी उत्सव मंगळवारी (१५ सप्टेंबर) भक्तिभावात संपन्न झाला.

उत्सवानिमित्त सकाळी अभिषेक, महाआरती, दुपारी भजन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिवसभर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली असून दहा हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून महाप्रसादाचे वितरण सुरू झाले. भक्तांसाठी झुणका-भाकर, मसाले भात व शिऱ्याचा महाप्रसाद दहा हजारांहून अधिक भाविकांनी घेतला. रात्री १२ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण सुरू होते. रक्तदान शिबिरात सुमारे ५० ते ६० भाविकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे निर्मल नगरीतील ऋषिपंचमी उत्सवाला भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचे स्वरूप लाभले. विशेष म्हणजे संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व आयोजक तसेच भक्तगणांनी अथक परिश्रम घेतले.





