spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रशेखर आझाद यांच्यावरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरात प्रदर्शन

– आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाईसह खासदारांना Z+ सुरक्षा देण्याची आजाद समाज पार्टीची मागणी

नागपूर :- आजाद समाज पार्टी (कांशीराम) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या सोबत 13 सप्टेंबर 2026 रोजी, उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ नागपुरात आजाद समाज पार्टीच्या वतीने प्रदर्शन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष ओपूल तामगाडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून घटनेची निष्पक्ष चौकशी, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई आणि चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घेण्याची मागणी करण्यात आली. चंद्रशेखर आझाद हे गोंडा येथील विनोद कुमार साहनी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना बाराबंकीच्या शहाबपूर टोल प्लाझाजवळ पोलिसांनी त्यांचा ताफा थांबविल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रामनगर येथील सर्किट हाऊसकडे नेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाई नंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि टोल प्लाझावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, आजाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, या घटनेदरम्यान चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली तसेच काही वाहनांची तोडफोड झाली. काही वृत्तांमध्ये ताफ्यावर कथित दगडफेक झाल्याने कार्यकर्ते जखमी झाल्याचाही उल्लेख आहे. या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी विविध ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात आजाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. निवेदनात घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), शस्त्र अधिनियम तसेच अनुसूचित जाती- जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील लागू तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात चंद्रशेखर आझाद यांच्या जीवितास धोका असल्याचा दावा करत त्यांच्या सुरक्षेचे तातडीने Threat Assessment करून, केंद्र सरकारने आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच घटनेची स्वतंत्र चौकशी करून CCTV फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग, बॉडी- कॅम फुटेज आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षित ठेवावेत, अशीही मागणी करण्यात आली.

पक्षाच्या वतीने यापूर्वी 28 जून 2023 रोजी सहारनपूर येथे चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेचाही निवेदनात संदर्भ देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा व्यापक आढावा घेऊन भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनाची प्रत पोलीस प्रशासनासह राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही पाठविण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ओपूल तामगाडगे, जिल्हा उपाध्यक्ष आशिष निस्वादे, जिल्हा सचिव विशाल बनसोड, सुरज पुरानिक, रोशन ठवरे, जिल्हा महासचिव शोएब खान, अश्विन पाटील, दीपक पाटील, दक्षिण- पश्चिम विधानसभा अध्यक्ष बादल बनसोड, दीक्षा ताई चवरे यांच्यासह आजाद समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.