खापा, वार्ताहर :- युवक काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी अंकित वामनराव मुंगोले यांची सावनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माजी मंत्री सुनील केदार, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष आश्विन बैस, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मिथिलेश कान्हेरे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेरचे सभापती रविंद्र चिखले यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.
अंकित मुंगोले यांनी यापूर्वी विविध संघटनात्मक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून, युवकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. स्पष्टवक्तेपणा, संघटन कौशल्य, नेतृत्वाची क्षमता आणि कोणत्याही कामासाठी तत्परतेने धावून जाण्याची कार्यपद्धती यामुळे त्यांच्यावर तालुका युवक काँग्रेसची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
आगामी लोकसभा, विधानसभा तसेच नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवकांचे संघटन मजबूत करणे, नव्या युवा कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे आणि ग्रामीण भागातील युवकांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या दृष्टीने मुंगोले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
“ग्रामीण भागातील तरुण आणि शेतकरी पुत्रांच्या प्रश्नांना प्राधान्याने वाचा फोडणे ही माझी पहिली जबाबदारी आहे. ग्रामीण युवाशक्तीला तालुक्याच्या नेतृत्वात पुढे आणणे हाच आमचा संकल्प आहे,” असे नवनियुक्त तालुका अध्यक्ष अंकित मुंगोले यांनी सांगितले.
या नियुक्तीसाठी सावनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव अढाऊ, नगरसेवक नामदेव गजभिये, आशिष ढाले, युवक काँग्रेस खापा शहर अध्यक्ष मुकेश पावडे, आशिष ठाकूर, अक्षय हिंगे, संदीप गिरपुंजे तसेच सहकाऱ्यांचे मुंगोले यांनी आभार मानले. नियुक्तीनंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





