हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी सध्या पाण्याअभावी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास १५ ते १६ हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली असून हजारो शेतकरी धान पिकावर अवलंबून आहेत.
यावर्षी पावसाची अनियमितता व खंड पडल्यामुळे धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांचे पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही बावनथडी प्रकल्पाचे पाणी अद्याप शेतीसाठी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन धान पिकासाठी बावनथडीचे पाणी सोडावे.
शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाने पाणी सोडण्यास विलंब केल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तुमसर–मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला आहे.





