spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कबड्डी प्रमाणपत्र वाटपात गैरव्यवहार; खेळणाऱ्या खेळाडूंना डावलून गैरहजरांना बोगस प्रमाणपत्रे?

– राष्ट्रीय खेळाडू हरजिंदर सिंग सोखी यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

– माहितीच्या अधिकारात (RTI) धक्कादायक बाब उघड; सखोल चौकशीची मागणी

हंसराज,भंडारा मोहाडी :- तुमसर येथे पार पडलेल्या ७३ व्या सिनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंची निवड प्रक्रिया आणि प्रमाणपत्र वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मैदानात घाम गाळून जिल्ह्याला उपविजेतेपद मिळवून देणाऱ्या मूळ खेळाडूंना डावलून, निवड चाचणीला गैरहजर राहिलेल्या व प्रत्यक्ष मैदानात न उतरलेल्या व्यक्तींना बोगस प्रमाणपत्रे वाटण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची क्रीडा विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोहाडी येथील पत्रकार परिषदेत करण्यात आली.

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू हरजिंदर सिंग सोखी आणि खेळाडू देवेंद्र बांडेबुचे यांनी पत्रकार परिषदेत माहिती अधिकारातून (RTI) प्राप्त कागदपत्रांच्या आधारे संघटनेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी मोहाडी येथे जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनतर्फे जिल्हा संघ निवड चाचणी (ट्रायल) घेण्यात आली होती. मात्र, चाचणी झाल्यानंतर अधिकृत संघ जाहीर करण्यात आला नाही, तसेच खेळाडूंना पत्र किंवा फोनद्वारे कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही.

गंभीर बाब म्हणजे, निवड चाचणीच्या दिवशी उपस्थित नसलेल्या परजिल्ह्यातील खेळाडूंचा परस्पर संघात समावेश करण्यात आला. त्यानंतर ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान तुमसर येथे आयोजित ७३ व्या सिनियर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कोणत्याही चाचणीशिवाय खेळाडू खेळवण्यात आले. या स्पर्धेत भंडारा जिल्हा संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय स्थान (उपविजेतेपद) पटकावले होते.

स्पर्धा संपल्यानंतर मैदानात प्रत्यक्ष खेळलेल्या खेळाडूंना उपविजेतेपदाचे प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात खेळलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र न देता, त्यांच्या जागी स्पर्धेत प्रत्यक्ष न खेळलेल्या चार जणांना परस्पर उपविजेतेपदाची बोगस प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राष्ट्रीय खेळाडू हरजिंदर सिंग सोखी यांनी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात (RTI) अर्ज करून कागदपत्रे मिळवली असता, हा सर्व गैरप्रकार उघडकीस आला. तसेच खेळाडू देवेंद्र बांडेबुचे यांनीही निवड चाचणी देऊनही आपल्याला डावलण्यात आल्याचा आणि चाचणी न देणाऱ्यांना प्रमाणपत्रे बहाल करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

क्रीडा प्रमाणपत्रांच्या जोरावर शासकीय नोकऱ्या आणि विविध सवलतींचा लाभ मिळवला जातो. मात्र, अशा प्रकारे मैदानात घाम गाळणाऱ्या होतकरू खेळाडूंच्या भविष्याशी खेळ करून बोगस प्रमाणपत्रे वाटणाऱ्या संबंधित असोसिएशनच्या जबाबदारांवर क्रीडा विभाग व प्रशासनाने तात्काळ चौकशी समिती नेमून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

हा आम्हाला बदनाम करने , प्रमाणपत्र कुणालाही विकल्या जात नाही पत्रकार परिषद घेऊन आमच्या बद्दल गैरसमज पासरविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सगळे आरोप खोटे आहेत. ते खेळाडू गोंदिया जिल्ह्याचे नसून भंडारा जिल्ह्याचेच आहेत.

– विनायक वाघाये,सचिव भंडारा जिल्हा कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.