– ५०० नागरिकांनी घेतला आरोग्यसेवेचा लाभ; ७५ जणांची मोतीबिंदूसाठी निवड, ८० नागरिकांचे रक्तदान
कामठी :- स्व. उमरावजी माकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भिलगाव येथील माकडे सेलिब्रेशन येथे आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सुमारे ५०० नागरिकांनी विविध आरोग्यसेवांचा लाभ घेतला. आरोग्य तपासणीसोबतच रक्तदानाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने शिबिराला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.
शिबिरात तपासणीदरम्यान ७५ नागरिकांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले. या रुग्णांना पुढील तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लता मंगेशकर रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. याशिवाय ८० नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले.
शिबिरात दंतचिकित्सा तपासणी, भौतिक उपचारपद्धती तसेच विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. डॉ. किशन तडस, डॉ. दीप्ती सेलोकर, डॉ. जयेश फुलबंधे, संदीप हेडाऊ यांच्यासह डॉक्टर व आरोग्यसेवकांनी नागरिकांना आरोग्यविषयक सेवा व मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुकूमचंद आमधरे होते. यावेळी सरपंच जयश्री इंगोले, संजीत सनी, गुणवंता माकडे, जगदीश कुकडे, शामराव चौधरी, संकेत कोरडे, अश्विन गभने, राहुल मेश्राम, योगेश माकडे, जावेद, राजेश बावणकुळे व विलास झंझोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गजानन वैद्य, उत्तम विश्वकर्मा, गोविंदराव लब्बा, लिलेश माकडे, प्रथम वैद्य, संस्कार यादव व अन्नू तुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शंभुनाथ शर्मा, मनोज कुमार, जितेंद्र प्रजापती, हरीशजी धनोरे व कांचन कुमारी यांनी सूत्रसंचालन केले. समारोपप्रसंगी खोजेंद्र माकडे यांनी डॉक्टर, रक्तदाते, आरोग्यसेवक, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
स्व. उमरावजी माकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या उपक्रमातून आरोग्यसेवा, रक्तदान आणि सामाजिक बांधिलकीचा त्रिवेणी संगम साधत गरजू नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.





