spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ड्रॅगन पॅलेस विपश्यना केंद्र : नागपुरात धम्माचा दुसरा दीपस्तंभ!

– ९ वर्षांची गौरवशाली वाटचाल पूर्ण करत १० व्या वर्षात पदार्पण; 

– २२ सप्टेंबर रोजी विशेष एकदिवसीय सामूहिक ध्यान साधना महाशिबिराचे आयोजन

कामठी :- दीक्षाभूमीनंतर बौद्ध धम्म आणि वैश्विक शांतीचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास आलेल्या कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील ‘आंतरराष्ट्रीय विपश्यना मेडिटेशन सेंटर’ २२ सप्टेंबर रोजी आपल्या स्थापनेच्या १० व्या वर्षात गौरवशाली पदार्पण करत आहे.

गेल्या ९ वर्षांत या विपश्यना केंद्राने जगभरातील हजारो साधकांच्या जीवनात मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविकासाची नवी पहाट फुलवली असून हे केंद्र धम्माचा एक सशक्त प्रकाशस्तंभ ठरले आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले होते लोकार्पण

२२ सप्टेंबर २०१७ चा दिवस कामठी व नागपूरकरांसाठी अविस्मरणीय ठरला. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती मा. श्री. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नागपुरातून केली होती. सकाळी पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर दुपारी त्यांनी कामठी येथील या भव्य विपश्यना केंद्राचे उद्घाटन केले.

उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपतींनी उद्गार काढले होते की—

“विपश्यना ही भगवान बुद्धांनी दिलेली अशी शास्त्रीय ध्यानपद्धती आहे, जी आपल्याला अंतर्मनाशी जोडते. आधुनिक तणावयुक्त जीवनात मन आणि शरीर शुद्ध करण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. विपश्यना ही कुठल्याही एका धर्मापुरती मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे.”

ॲड. सुलेखा कुंभारे यांचा संकल्प आणि पगोड्याचे विहंगम सौंदर्य

या आंतरराष्ट्रीय केंद्राची उभारणी ओगावा सोसायटी आणि ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख, माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या अथक परिश्रमांतून साकारली आहे. पूज्य गुरुजी सत्यनारायण गोयंका यांच्या प्रेरणेतून हे केंद्र १० एकरांच्या विस्तीर्ण निसर्गरम्य परिसरात उभे राहिले आहे.

भव्य वास्तुकला: ८३ फूट उंच मुख्य पगोडा आणि त्याभोवती १०-१० फुटांचे चार उप-पगोडे असून, त्यावर ८० निष्णात कलाकारांनी सुवर्ण मुलामा (गोल्ड पॉलिश) केला आहे.

अष्टधातूचे छत्र: मुख्य पगोड्याच्या शिखरावर अष्टधातूचे पवित्र छत्र स्थापित करण्यात आले आहे.

साधना कक्ष: येथे एकाच वेळी १२५ हून अधिक साधक बसून शांततेत ध्यान करू शकतील असे दोन प्रशस्त ध्यान कक्ष तयार करण्यात आले आहेत.

द्वितीय बुद्ध शासनाचा जिवंत आधारस्तंभ

परम पूज्य गुरुजी सत्यनारायण गोयंका सांगायचे की, ‘बुद्धं शरणं गच्छामि’ च्या घोषासह शतकांनंतर बुद्ध शासनाचा पुनरुद्घोष नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. ड्रॅगन पॅलेस विपश्यना केंद्र त्याच द्वितीय बुद्ध शासनाचा एक मजबूत स्तंभ म्हणून पुढे आले आहे. जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन समाजघटकांनी येथे १० दिवसीय निवासी शिबिरांतून आत्मपरीक्षण व मनःशांतीचा अनुभव घेतला आहे.

१० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष ध्यान साधना शिबिर

या १० व्या वर्धापन दिनाच्या औचित्यावर २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०४:३० वाजेपर्यंत ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर, कामठी येथे आयोजित करण्यात आले आहे.

ओगावा सोसायटी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, दादासाहेब कुंभारे परिसर, ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, कामठी आयोजक आहेत.

या शिबिरात विशेषतः सहायक आचार्य, बाल शिबिर शिक्षक, किमान एक १० दिवसीय शिबिर पूर्ण केलेले जुने साधक-साधिका तसेच विपश्यना केंद्रात सेवा देणारे धम्मसेवक यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या पावन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मलाभ घ्यावा, असे विनम्र आवाहन संस्थेच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.