कामठी :- अजनी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह यातील पाहिजे असलेला आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA) कारवाई झालेला आरोपी शेख समीर शेख रहीम ऊर्फ बोमट्या यास नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी अखेर छत्तीसगडमधील दुर्ग येथून शिताफीने ताब्यात घेतले.
सदर आरोपी उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल असताना पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला होता. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू होता. दरम्यान, आरोपी दुर्ग परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ कारवाई करीत दुर्ग येथे सापळा रचला. आरोपीची ओळख पटवून त्याला कोणतीही संधी न देता शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला अजनी पोलिसांच्या ताब्यात सोपविण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक महेश आंधळे,विवेक दोरसेटवार ,योगेश नालटे,आशिष बागडे आदींनी केली.





