– गोठणगाव मुख्य कालव्यावरील कन्हाळगाव–महालगाव मार्गावरील घटना; चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा
पंकज परशुरामकर,नवेगाव बांध :- तालुक्यातील मौजा महालगाव परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल ११ कृषी मोटार पंप चोरीला गेल्याची घटना १७ सप्टेंबरच्या रात्री घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोठणगाव मुख्य कालव्यावरील कन्हाळगाव–महालगाव रोड परिसरात कालव्यावर लावण्यात आलेले कृषी मोटार पंप चोरट्यांनी लंपास केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन शेतीच्या हंगामात कृषी पंप चोरीला गेल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी अर्जुनी मोरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन कृषी पंप चोरीच्या घटनेची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने पाहून आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आदेश अर्जुनी मोर पोलीस ठाण्याला देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत कृषी पंप खरेदी केले आहेत. मात्र, एका रात्रीत ११ कृषी पंप चोरीला गेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन कृषी पंप खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चोरीला गेलेले कृषी पंप तातडीने शोधून शेतकऱ्यांना परत मिळवून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे महालगावसह कन्हाळगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, रात्रीच्या वेळी शेतातील विद्युत मोटार, केबल व इतर साहित्य सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून चोरीच्या घटनांमागील आरोपींचा शोध घ्यावा तसेच परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान, कृषी पंप चोरीच्या या घटनेची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि चोरीला गेलेले पंप परत मिळाले नाहीत, तर धान उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणा या घटनेचा तपास कितपत वेगाने करतात, याकडे महालगाव परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





