– पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती; ३५ वर्षांचा शैक्षणिक व प्रशासकीय अनुभव
नागपूर :- महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (MNLU), नागपूरच्या कुलगुरूपदाची सूत्रे प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे यांनी स्वीकारली आहेत. विद्यापीठाचे कुलपती तथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल एस. चांदूरकर यांनी त्यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे MNLU नागपूरच्या शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्राला अनुभवी नेतृत्व लाभले आहे. प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे यांनी यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेत वरिष्ठ प्राध्यापक तसेच स्कूल ऑफ लॉच्या संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना शैक्षणिक, प्रशासकीय आणि विधी क्षेत्रातील तब्बल ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. तसेच विधी विभागप्रमुख आणि पुण्यातील नामांकित विधी महाविद्यालयांच्या प्रभारी प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. प्रा.भाकरे यांचे विशेष प्रावीण्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि कायदा, वैद्यकीय निष्काळजीपणा संबंधीचे न्यायप्रकरणे तसेच आरोग्यविषयक कायदे व धोरणे या क्षेत्रांत आहे. त्यांनी एलएल. एम. आणि पीएच.डी. या उच्च शैक्षणिक पदव्या संपादन केल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी सात वर्षे वकिलीचा व्यावसायिक अनुभव घेतला आहे. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. भारताच्या राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित अभ्यागत प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक केंद्रीय विद्यापीठांच्या कार्यकारी परिषदांवर जबाबदारी पार पाडली आहे. तसेच महाराष्ट्र शासनासाठी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विषयक धोरणांबाबत कायदेविषयक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. प्रा.भाकरे या World Association of Medical Lawच्या सदस्य असून त्यांनी अनेक संशोधकांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले आहे. विधी, वैद्यकीय क्षेत्र आणि सार्वजनिक धोरण यांचा परस्परसंबंध असलेल्या विषयांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण शैक्षणिक योगदान राहिले आहे. प्रा.(डॉ.) ज्योती भाकरे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर MNLU नागपूरच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीबरोबरच संशोधन, विधी शिक्षण आणि संस्थात्मक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीला त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ होईल, अशी भावना विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थीवर्गातून व्यक्त करण्यात आली. दरम्यान, विद्यापीठाच्या कार्यवाहक कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळणारे प्रा.डॉ.व्ही.पी.तिवारी यांच्याकडून प्रा.भाकरे यांनी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली. MNLU नागपूरच्या विद्यापीठ परिवाराने प्रा.डॉ.ज्योती भाकरे यांचे स्वागत करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





