गडेगाव :- लाखनी तालुक्यातील गडेगाव शिवारात रस्ता ओलांडताना अज्ञात ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत एका वाघिणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला असून, वनविभागाने त्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गडेगाव परिसरातील जंगलातून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने वाघिणीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गंभीर दुखापत झाल्याने वाघिणीचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गडेगाव येथील वन डेपोमध्ये हलवला आहे.
दरम्यान, वाघिणीला धडक देऊन पसार झालेल्या ट्रकचा शोध घेण्यासाठी महामार्गावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि टोलनाक्यांवरील नोंदी तपासल्या जात आहेत. हा परिसर वन्यजीवांचा भ्रमणमार्ग असल्याने महामार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी आता वन्यजीवप्रेमींमधून जोर धरू लागली आहे.





