हंसराज, भंडारा :- शहरातील गुरुनानक वार्ड, सिंधी कॉलनी येथील प्रसिद्ध ‘विघ्नहर्ता गणेश मंडळा’च्या मंडपातून बाप्पाच्या मूर्तीला अर्पण केलेला पैशांचा हार आणि मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखा व भंडारा शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कसून तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला ‘ओप्पो’ (Oppo) कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या मंडपात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून गणेशमूर्तीला अर्पण केलेला पैशांचा हार व तेथील मोबाईल लंपास केला होता. या प्रकरणी मंडळाचे कार्यकर्ते पियुष सुंदर खनवानी (रा. गुरुनानक वार्ड, भंडारा) यांच्या तक्रारीवरून भंडारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक १९९६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या काळात थेट बाप्पाच्या मंडपातच चोरी झाल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि भंडारा शहर पोलिसांचे विशेष पथक स्थापन करून आरोपीचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारीक पडताळणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी आर्यन उर्फ गोलु भगवानदास अहिरकर (वय २० वर्षे, रा. चांदणी चौक, भंडारा) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या पैशांच्या हारातील नगदी १,१२० रुपये आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, भंडारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी तसेच दोन्ही विभागांतील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





