– मनपा आयुक्तांसह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली दीक्षाभूमी परिसराची संयुक्त पाहणी
नागपूर :- दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात येत असलेल्या सुरक्षा भिंतीची योग्य व मजबूत व्यवस्था करण्यात यावी. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम सोयीसुविधा देण्यासह इतर नागरी सुविधांला प्राधान्य द्यावे, सर्व व्यवस्था १४ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावी असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विपीन आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी (ता.२४) दीक्षाभूमी परिसराला येथे भेट दिली. यावेळी प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्यासमवेत आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम.,अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण माहेर, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, समाज कल्याण सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, मनपाच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता विजय गुरूबक्षाणी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, राजेंद्र राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुल्हाने, मनपाचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, अग्निशमन विभागाचे /तुषार बारहाते, परिवहन प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी, स्मारक समितीचे प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा आयुक्त डॉ. विपीन आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर, मुख्य समारंभाचे ठिकाण, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथील इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), सामाजिक न्याय भवन परिसरातील पार्किंगच्या जागेवर शौचालयाची व्यवस्था, अंबाझरी तलाव परिसर येथे उभारण्यात येणाऱ्या स्थानगृहासह इतर व्यवस्थेची पाहणी केली.
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी परिसरातील स्वच्छतागृहे, जमिनीचे समतलिकरण आणि एकूणच स्वच्छता व्यवस्थेची सखोल पाहणी केली. नागरिकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा चोख ठेवावी. याशिवाय कारागृह परिसरातील सर्व आवश्यक व्यवस्था येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावी असेही निर्देश त्यांनी दिले. तर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सर्व विभागांनी उत्तम समन्वय राखून नियोजित वेळेत कार्य करण्याच्या सूचना दिल्या.





