spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अखेर कामठी तालुक्यातील वडोदा येथे अपर तहसील कार्यालयास प्रशासकीय मंजुरी

संदीप कांबळे,कामठी :- कामठी तालुक्यातील वडोदा येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.या अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत वडोदा, महालगाव व तरोडी (बु)या तीन महसूल मंडळाचा समावेश असून कामठी तालुक्यातील एकूण 77 गावापैकी 49 गावांचा समावेश राहणार आहे तर कामठी तहसील कार्यालय अंतर्गत कामठी व कोराडी असे फक्त दोन महसूल मंडळ राहणार असून 28 गावाचा समावेश राहील. महसूल विभागाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, त्यामुळे कामठी तालुक्यातील महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण होणार आहे.

वडोदा येथे स्थापन होणाऱ्या अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वडोदा, महालगाव आणि तरोडी (बु.) या तीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप, तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या आणि नागरिकांना महसूल सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अपर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यभरात नव्याने ४७ अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील वडोदाचाही समावेश आहे.

वडोदा येथे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित महसूल मंडळांतील नागरिकांना विविध महसूलविषयक कामांसाठी कामठी तहसील कार्यालयात येण्याची गरज कमी होणार आहे. जमीनविषयक नोंदी, महसूल प्रकरणे, विविध दाखले तसेच शासनाच्या महसूल विभागाशी संबंधित सेवांना स्थानिक पातळीवर गती मिळण्याची अपेक्षा आहे.

या कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यवाहीसाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्हाधिकारी, नागपूर हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

वडोदा येथे अपर तहसील कार्यालयाची मंजुरी हा कामठी तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय ठरला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.