– येसंबा हे मौदा तालुक्यातील एकमेव 51 फुटी कळस असलेले देवस्थान ठरणार; भाविकांमध्ये उत्साह
किशोर साहू,मौदा :- चाचेर-निमखेडा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या येसंबा येथील श्री हनुमान मंदिराच्या कळसाचे भव्य बांधकाम सुरू असून, तब्बल 51 फूट उंचीचा कळस साकारला जात आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील विशेष कारागीर या कळसाचे बांधकाम करीत आहे. मौदा तालुक्यात अशा प्रकारचा 51 फुटी कळस असलेले येसंबा हे एकमेव देवस्थान ठरणार असल्याने परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री हनुमान मंदिर परिसराच्या विकासाच्या दृष्टीने हा कळस विशेष आकर्षण ठरणार आहे. मंदिराची धार्मिक व आध्यात्मिक परंपरा जपत ग्रामस्थ, भाविक आणि देणगीदारांच्या सहकार्याने कळसाचे बांधकाम करण्यात येत आहे. भव्य कळसामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार असून, येसंबा गावाच्या धार्मिक पर्यटनाला देखील चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या भव्य कळसाच्या बांधकामासाठी ग्रामस्थ व भाविकांचे सहकार्य लाभत असून, मंदिर विकासासाठी पुढील काळातही विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.श्री हनुमान मंदिराच्या 51 फुटी कळसामुळे येसंबा गावाच्या धार्मिक वैभवात मानाचा तुरा रोवला जाणार आहे, असे देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी व सध्या बांधकामावर विशेष देखरेख ठेवणाऱ्या पोलीस पाटील नरेंद्र राऊत यांनी सांगितले.





