– शासनाचा साठा खपवण्यासाठी जनतेच्या आहारावर गदा नको : माजी आमदार चरण वाघमारे यांचा इशारा
हंसराज,भंडारा :- शासकीय गोदामातील मक्याचा साठा खपवण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचा हक्काचा गहू बंद करून त्यांच्यावर मका लादण्याचा प्रकार अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सुरू आहे. हा सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आहारावर आणि हक्कांवर झालेला मोठा अन्याय आहे. त्यामुळे मका लादणे त्वरित थांबवून जिल्ह्यात गव्हाचे वाटप पूर्ववत सुरू करावे, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यातील रास्त भाव (रेशन) दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना गव्हाऐवजी केवळ मका वितरित केला जात असल्याच्या तीव्र तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार चरण वाघमारे यांनी पुरवठा विभागाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.
मक्याचा साठा खपवण्यासाठी जनतेचा बळी नको!
यासंदर्भात बोलताना चरण वाघमारे म्हणाले की, “भंडारा जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबांच्या रोजच्या आहारात गव्हाच्या पोळ्यांचा समावेश असतो. लोकांची मागणी नसताना केवळ शासनाकडे मक्याचा साठा शिल्लक आहे किंवा मक्याची खरेदी झाली आहे म्हणून तो शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारणे चुकीचे आहे. शासनाचा साठा खपवण्यासाठी नागरिकांच्या आहाराच्या सवयी आणि गरजा बदलता येणार नाहीत. शासनाला मका द्यायचाच असेल, तर गव्हाला पर्याय म्हणून न देता गव्हासोबत अतिरिक्त मका द्यावा; परंतु गहू पूर्णपणे बंद करणे अन्यायकारक आहे.”
गेल्या ३ महिन्यांत किती गहू आला? श्वेतपत्रिका काढा!
शासनाच्या अधिकृत ‘PDS’ (सार्वजनिक वितरण प्रणाली) पोर्टलवर संपूर्ण राज्यभरात गहू वितरणाची नोंद दिसत आहे. मग असे असताना भंडारा जिल्ह्यातच गव्हाचा तुटवडा का भासत आहे? गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यासाठी प्रत्यक्ष किती गहू मंजूर झाला आणि त्यापैकी किती गहू वितरित करण्यात आला, याची पारदर्शक माहिती शासनाने व जिल्हा पुरवठा विभागाने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत हजारो कुटुंबे रेशनवर अवलंबून आहेत. शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबांचे मोठे हाल होत आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, भंडारा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारकांना त्वरित नियमित गव्हाचा पुरवठा सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही चरण वाघमारे यांनी दिला आहे.





