spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा पोलिसांचा खाक्या: मोहाडीतील ३ सराईतांना ठोकली तडीपारी; चालू वर्षात तब्बल ३७ गुन्हेगार हद्दपार!

हंसराज, भंडारा मोहाडी :- जिल्ह्यातील अवैध धंदे, वाळू तस्करी आणि अमली पदार्थांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी भंडारा जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मोहाडी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील दोन सराईत रेती तस्कर आणि एका बेकायदेशीर दारू व अमली पदार्थ विक्रेत्याला भंडारा जिल्ह्याच्या सीमाभागातून १ महिन्याकरिता तडीपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी तुमसर यांनी हे आदेश जारी केले असून, या कारवाईमुळे चालू वर्षात जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची एकूण संख्या आता ३७ वर पोहोचली आहे.

मोहाडी परिसरात सातत्याने बेकायदेशीर कारवाया करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या समाजकंटकांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहाडी पोलीस ठाण्याचे ठाणेप्रभारी अधिकारी यांनी गुन्हेगारी अभिलेख तपासून तडीपारीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तुमसर येथे कायदेशीर मंजुरीसाठी सादर करण्यात आला.

सादर प्रस्तावाची सखोल पडताळणी करून, सराईत गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी (तुमसर) गणेश दिघे यांनी तिन्ही गुन्हेगारांना दिनांक २२ सप्टेंबर २०२६ पासून १ महिन्याकरिता भंडारा जिल्ह्याच्या स्थलसीमेतून तडीपार करण्याचे आदेश पारित केले. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये अवैध रेती तस्कर राहुल गजानन बांडेबुचे (वय २५ वर्षे, रा. रोहा, ता. मोहाडी), प्रदिप उर्फ बबलु राधेश्याम बांडेबुचे (वय २८ वर्षे, रा. रोहा, ता. मोहाडी) तसेच दारू विक्री व अमली पदार्थ बाळगणारा , रुपेश नथ्थु सोनकुसरे (वय ३५ वर्षे, रा. टिळक वार्ड मोहाडी, ता. मोहाडी) यांचा समावेश आहे.

सदर धडक कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, मोहाडी पोलीस ठाण्याचे ठाणेप्रभारी अधिकारी बेलखेडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.