– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे प्रतिपादन
राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा करत जवळपास 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याचे काम देवाभाऊंच्या सरकारने केले आहे. आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खोटे अश्रू काढत नाही. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या शेतीला मदत करत सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत हा संदेश देत सगळ्यात मोठ्या संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सरकारच्या या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना बन म्हणाले, धाराशिव, लातूर, सोलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट मिळणार आहे आणि पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. शेती निगडित कर्जवसुलीला पूर्ण स्थगिती देण्यात येईल. खरेतर याआधीच सरकारने कुठलीही निवडणूक नसताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु या कर्जमाफीत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, त्या कर्जमाफीला स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय कृषी पंपाच्या चालू वसुलीतही सूट मिळणार आहे. 7.5 एचपीपर्यंत शेतकऱ्यांना वीजबिल नसते. परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडे 7.5 एचपीच्यावर एक कृषी पंप असतो आणि दुष्काळात पाण्याची पातळी खाली गेलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर 7.5 एचपीवरील पंपांच्या बिलामध्ये सवलत देण्याचे आणि वसुली थांबवण्यात येणार आहे.
याशिवाय शाळा – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात पूर्णपणे माफी केली जाणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत नियम शिथिल करून जास्तीतजास्त काम केले जाईल, जेणेकरून लोकांच्या हाताला काम मिळाले तर त्यांच्या हातात दोन पैसे येतील. त्यामुळे रोजगार हमी योजनेमध्येही काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात येणार आहेत. सुदैवाने जायकवाडीसारखी मोठी धरणे बऱ्यापैकी भरलेली आहेत. परंतु शेवटी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. दुष्काळ जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यसाठी सरकार विशेष खबरदारी घेणार असल्याचे बन यांनी नमूद केले.
बन पुढे म्हणाले, शेतमजुरांना अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत केला जाईल. दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने आवश्यक तेथे चारा छावण्या उभारण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामेही हाती घेतील. 2016 मध्ये पडलेल्या दुष्काळावेळी मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवाराची कामे झाल्याने त्यानंतर राज्यात दुष्काळ पाहायला मिळालेला नाही. त्या कामांचा फायदा मिळून दहा वर्षे झाली आहेत. आता उर्वरित कामे पूर्ण करून येणाऱ्या काळात मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळ कायमचा हद्दपार व्हावा, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे भाऊ या नात्याने आपण शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे आहोत, हा संदेश देवाभाऊंनी दुष्काळ जाहीर करून दिला आहे. खरेतर विरोधक झोपलेले आहेत. विरोधक कुठेही बांधावर नसताना सरकार फक्त बांधावर गेले नाही, तर शेतकऱ्यांसाठी दुष्काळाची घोषणा केल्याचे बन यांनी नमूद केले.




