– शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराची जबाबदारी; वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी
नागपूर :- युवासेनेच्या पूर्व विदर्भातील संघटनात्मक कार्याला अधिक बळ देण्यासाठी रोहित रमेश मिश्रा यांची युवासेना पूर्व विदर्भ समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालया च्यावतीने ३ सप्टेंबर २०२६ रोजी, या संदर्भातील नियुक्तीपत्र जारी करण्यात आले. नियुक्तीपत्रानुसार, शिवसेना मुख्य नेते तथा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित मिश्रा यांची युवासेना पक्षाच्या पूर्व विदर्भ समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील युवकांशी संपर्क वाढविणे, युवासेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे तसेच विविध सामाजिक व सार्वजनिक प्रश्नांमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्याची जबाबदारी या पदाच्या माध्यमातून मिश्रा यांच्यावर राहणार आहे. नियुक्तीपत्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्षाच्या विस्तारासाठी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या नियुक्तीबद्दल रोहित मिश्रा यांचे युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन होत असून, पूर्व विदर्भातील युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी आणि संघटनात्मक कार्याला गती देण्यासाठी त्यांच्या नियुक्तीची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट होते. नियुक्तीपत्रावर पूर्वेश परिषा प्रताप सरनाईक (पूर्वी युवासेना कार्याध्यक्ष), किरण साळी (युवासेना सचिव) आणि राहुल लोंढे (युवासेना मुख्य सचिव) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
“आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा,” अशा शब्दांत नियुक्तीपत्रातून रोहित मिश्रा यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.




