Home Latest News विकास अर्बन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

विकास अर्बन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

0
1

– सभासदांचा विश्वास आणि सहकार्य हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद – दिलीप सुरकार

नागपूर :- कुकडे ले- आऊट येथील विकास अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नामदेव महाराज सभागृह, कुकडे ले- आऊट येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष दिलीप सुरकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष दिलीप सुरकार यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा आलेख सभासदां समोर मांडला. संस्थेने केलेली प्रगती, विविध उपक्रम तसेच सभासदांच्या हितासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना दिलीप सुरकार यांनी, सभासदांचा संस्थेवर असलेला विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद असून, सभासदांनी दिलेल्या सहकार्यामुळे संस्थेला सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता आली आहे, असे प्रतिपादन केले.

संस्थेच्या विकासासाठी सभासद, पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व सभासदांचे त्यांनी आभार मानत अभिनंदन केले. यानंतर संस्थेचे व्यवस्थापक तेजराव काळमेघ यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाची माहिती, विविध आर्थिक व प्रशासकीय बाबी तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भातील माहिती सभासदां समोर सादर करण्यात आली. सभासदांनी यावेळी विविध विषयांवर चर्चा करून संस्थेच्या कामकाजा बाबत आपली मते व सूचना मांडल्या. सभेचे प्रभावी संचालन संस्थेच्या सह व्यवस्थापिका वैशाली चव्हाण यांनी केले. उपस्थित सभासदांनी संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करत भविष्यातही संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आलेला सत्कार. संस्थेशी संबंधित सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या या उपक्रमाचे उपस्थित सभासदांनी स्वागत केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी ढगे, कांबळे, तिवारी, भागवत, लांबट, हाडगे, चौधरी, निनावे, खाडे, लोणारे यांच्यासह संस्थेचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.