जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सूर्यांशू बारसेचे सुवर्ण यश; तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत धडक!

0
5

– महर्षी विद्या मंदिर, फुलमोगरा शाळेच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरीहंसराज,

भंडारा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेत (सन २०२६-२७) महर्षी विद्या मंदिर, फुलमोगरा शाळेचा खेळाडू सूर्यांशू सुभाष बारसे याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्याने ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारातील तिन्ही अंतरांच्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.

स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सूर्यांशू बारसे याने अप्रतिम जलतरण कौशल्याचे प्रदर्शन करत ‘ब्रेस्ट स्ट्रोक’ जलतरण प्रकारात पुढीलप्रमाणे यश मिळविले:

– ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक: प्रथम क्रमांक

– १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक: प्रथम क्रमांक

– २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक: प्रथम क्रमांक

एकाच प्रकारातील ५०, १०० आणि २०० मीटर अशा तिन्ही स्पर्धांमध्ये अव्वल स्थान कायम ठेवत त्याने सुवर्ण यश मिळवले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची आगामी विभागीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सूर्यांशूच्या या यशाबद्दल महर्षी विद्या मंदिर, फुलमोगरा शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच क्रीडाप्रेमी व नागरिकांकडून त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत असून आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.