गोवंश तस्करीविरोधात पोलिसांचा मोठा दणका; ७६ गोवंशाची सुटका

0
4

– गादा-नेरी मार्गावर गुन्हे शाखा व नवीन कामठी पोलिसांची संयुक्त कारवाई; ६४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

कामठी :- गोवंश तस्करीविरोधात नागपूर शहर गुन्हे शाखेच्या भूमाफिया विरोधी पथकाने आणि नवीन कामठी पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करीत तब्बल ७६ गोवंशीय जनावरांची सुटका केली. गादा ते नारी मार्गावरील गादा शिवारातील हनुमान डेअरी फार्म येथे पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत दोन दहा चाकी ट्रकसह एकूण ६४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २७ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ३.५० वाजता पोलिस पथकाने दोन पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. यावेळी दोन टाटा मोटर्सच्या दहा चाकी ट्रकमध्ये गोवंशीय जनावरांची कोणतीही सुरक्षित व्यवस्था न करता, चारा-पाण्याची व्यवस्था व योग्य देखभाल न करता जनावरांना क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात कोंबून वाहतूक करण्याची तयारी सुरू असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान एमएच ४० एन ७५१७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २१ गोवंशीय जनावरे, तर एमएच ४० बीजी ४०७६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २६ गोवंशीय जनावरे आढळून आली. घटनास्थळावरून आणखी २९ लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांना ताब्यात घेण्यात आले. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ७६ गोवंशाची तस्करीच्या तावडीतून सुटका केली.

पोलिसांनी दोन दहा चाकी ट्रक, गोवंशीय जनावरे, दुचाकी वाहने तसेच जनावरांना बांधण्यासाठी वापरण्यात आलेली नायलॉन दोरी असा एकूण ६४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या प्रकरणी नवीन कामठी पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.