लाल बावटा वाहतूक कामगार युनियनतर्फे शहीद भगतसिंग यांना अभिवादन

0
4

– क्रांतिकारक विचार आणि त्यागाची प्रेरणा जपण्याचा निर्धार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

नागपूर :- लाल बावटा वाहतूक कामगार युनियन महाराष्ट्राच्या वतीने महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात युनियनचे पदाधिकारी, वाहतूक कामगार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी शहीद भगतसिंग यांच्या धाडसी विचारांचे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. भगतसिंग यांनी तरुणाईमध्ये स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाची भावना निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमधून आजच्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. यावेळी भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. “शहीद भगतसिंग अमर राहो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कामगारांच्या हक्कांसाठी तसेच सामाजिक न्याय आणि समतेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. लाल बावटा वाहतूक कामगार युनियन महाराष्ट्राच्या वतीने आयोजित या अभिवादन कार्यक्रमातून शहीद भगतसिंग यांच्या त्यागाची आणि क्रांतिकारी विचारांची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश गुरुप्रीत सिंग यांनी यावेळी दिला. याप्रसंगी अनिश सिरकिया, चंदू पानतावणे, सचिन मुडे आणि पुष्पा सोनबावणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.