– डॉ. हरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
हंसराज,भंडारा तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील अंतिम टोकावर असलेल्या तुमसर व मोहाडी या दोन्ही तालुक्यांमध्ये निसर्गाचा लहरीपणा आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके तात्काळ ‘दुष्काळग्रस्त’ घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यात यावा, या मागणीचे निवेदन तुमसरचे तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना सादर करण्यात आले.
हे निवेदन भंडारा जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरचे संचालक डॉ. हरेंद्र रहांगडाले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
यंदा पावसाच्या अनियमितेतेमुळे शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. त्यातच खोडकिडा, गादमाशी, मावा, तुडतुडा आणि पाने गुंडाळणारी अळी यांसारख्या विविध रोगांनी धान पिकाला मोठ्या प्रमाणावर ग्रासले आहे. यामुळे “तेलही गेले आणि तूपही गेले, हाती आले धुपाटणे” अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी या दोन्ही तालुक्यांना वगळल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष खदखदत आहे. त्यामुळे शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
सध्या रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले असून डिझेल, शेतीचे साहित्य आणि मजुरीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि निसर्गाच्या मारामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. या परिस्थितीची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्यासह माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवून लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदन सादर करताना डॉ. हरेंद्र रहांगडाले, बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, राजू माटे, मुकुंदा आगाशे, वीरेंद्र रंगारी, धनराज चौधरी, राजकुमार चांदेवार, अमित कुंजेवार, भगवान चांदेवार, राकेश धार्मिक यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








