spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गुमगाव मॉयल खानमध्ये श्रवण सुरक्षेबाबत जनजागृती, ‘मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका’; कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांच्या वापराचे आवाहन

खापा, वार्ताहर :- मॅंगनीज ओर इंडिया लिमिटेड (मॉयल)च्या गुमगाव खानमध्ये ‘आवाजामुळे होणारी श्रवणशक्ती कमी होणे’ (Noise-Induced Hearing Loss) या विषयावर व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा सर्वेक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. खानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठ्या आवाजामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरूक करणे तसेच श्रवणशक्तीच्या संरक्षणासाठी आवश्यक सुरक्षा उपायांची माहिती देणे हा शिबिराचा उद्देश होता.

या शिबिराला खाण सुरक्षा महासंचालनालय (DGMS), नागपूर कार्यालयाचे डॉ. कौशिक सरकार, तसेच मॉयलचे मुख्य महाव्यवस्थापक (उत्पादन) किशोर चंद्राकर आणि उपमहाव्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) डॉ. अमित तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. कौशिक सरकार यांनी ‘आवाजामुळे होणारी श्रवणशक्ती कमी होणे’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. खान परिसरातील सततच्या मोठ्या आवाजामुळे होणारे आरोग्यविषयक धोके, श्रवणशक्तीचे संरक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना माहिती दिली.

मुख्य महाव्यवस्थापक (उत्पादन) किशोर चंद्राकर यांनी कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी निर्धारित वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) नियमित व अनिवार्यपणे वापर करण्याचे आवाहन केले. विशेषतः ड्रिलिंग, क्रशिंग आणि मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण करणाऱ्या यंत्रसामग्रीच्या परिसरात काम करताना ईअर प्लग व इतर श्रवण सुरक्षा साधनांचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक महाव्यवस्थापक (विद्युत) मनीष डोंगरे यांनी केले. तर गुमगाव खानचे खान व्यवस्थापक उमेश्वर चरपे यांनी आभार मानले.

यावेळी आकाश साहू, शशिकांत ठाकरे, मनीष कटियाल यांच्यासह गुमगाव खानचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सुरक्षित कार्यसंस्कृतीला प्राधान्य देत सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Popular Articles