यवतमाळ :- सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. २, पारीजात सोसायटी, वडगाव, यवतमाळ येथे विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व, निबंध व रांगोळी स्पर्धा, आरोग्य शिबिराचे नियोजन तसेच महापुरुषांच्या विचारांतून विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर सभेचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी असलेली भीती व गैरसमज दूर करण्यासाठी सर्पजनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्पदंश झाल्यास कोणत्या तातडीच्या उपाययोजना कराव्यात, काय करावे आणि काय करू नये, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गृहपाल सचिन बोराडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आद्य क्रांतिकारक महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्पमित्र दिनेश तिवाडे, सर्पमित्र पवन दळवी, सर्पमित्र दुशांत शेळके आणि सर्पमित्र कृष्णा बहाडे उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिक अनिल आजनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी सापांची ओळख करून देत सापांचे महत्त्व समजावून सांगितले. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून, साप सामान्यतः स्वसंरक्षणासाठीच चावा घेतो, घरातील तसेच परिसरातील अडगळीची ठिकाणे स्वच्छ ठेवावीत, जेणेकरून सापांचा वावर कमी होईल, कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता सर्व विदयार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








