spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगन पॅलेस परिसराची सुरक्षा व्यवस्था सज्ज

– पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील लवकरच करणार पाहणी दौरा

– ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या विनंतीला पोलीस आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

कामठी :- आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर व ग्रामीण परिसरातील कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षा चोख ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने नुकतीच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित यंत्रणांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस टेम्पल आणि नागलोक यांसारख्या प्रमुख आस्थापनांचे पदाधिकारी, पोलीस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह महानगरपालिका, एनआयटी, महावितरण व अन्न-औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही पाळत, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि चोख बंदोबस्ताचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

ॲड. सुलेखा कुंभारे यांची विनंती आणि आयुक्तांची सकारात्मकता

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामठी येथील जागतिक ख्यातीप्राप्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देश-विदेशातून लाखो बौद्ध अनुयायी व भाविक वंदनेसाठी उपस्थित राहतात. या महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगन पॅलेस आणि संपूर्ण परिसरातील सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था व भाविकांच्या सोयी-सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना ड्रॅगन पॅलेस परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्याची आग्रही विनंती केली.

ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या विनंतीचा तात्काळ आदर ठेवत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ती मान्य केली असून, ते लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराचा सविस्तर पाहणी दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तात्काळ प्रतिसाद यंत्रणा आणि नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात येत असून, ड्रॅगन पॅलेस परिसरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांततेत व सुरक्षिततेत दर्शन घेता यावे यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

पोलीस आयुक्तांच्या या आगामी पाहणी दौऱ्यामुळे ड्रॅगन पॅलेस परिसरातील सुरक्षा व वाहतूक नियोजनाला अधिक गती मिळणार असून सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Popular Articles