– अंडर-१८ महाराष्ट्र रिले संघातून पटकावले सुवर्ण पदक
– ‘गोवा २०२६’ मधील कामगिरीने अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगावबांध (प्रतिनिधी) :- अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अरततोंडी या लहानशा गावातील सुकन्या पूर्वा लोथे हिने राष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करत संपूर्ण तालुक्यासह गोंदिया जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. गोव्यात पार पडलेल्या ‘पश्चिमी क्षेत्रीय ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६’ मध्ये तिने महाराष्ट्र रिले संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदकावर (गोल्ड मेडल) आपले नाव कोरले.
ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) च्या वतीने गोवा येथे या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १८ वर्षांखालील (अंडर-१८) मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या रिले संघातून धावताना गोंदिया जिल्ह्याची कन्या पूर्वा लोथे हिने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले व सुवर्ण पदक प्राप्त केले.
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्वा हिने राष्ट्रीय स्तरावर घेतलेली ही उत्तुंग भरारी कौतुकास्पद ठरली आहे. तिच्या या यशामुळे अरततोंडी गावाचे नाव क्रीडा विश्वात उज्ज्वल झाले असून, तिच्यावर क्रीडाप्रेमी व नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.








