spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जैन कलार समाजातर्फे ४ ऑक्टोबरला भव्य महाआरोग्य शिबिर

– हृदयापासून डोळ्यांपर्यंत विविध तपासण्या निःशुल्क; औषधे, चष्मे आणि आयुष्यमान कार्डबाबत मार्गदर्शन

नागपूर :- नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, विविध आजारांचे वेळीच निदान करणे आणि सर्वसामान्यांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून प्रयास जैन कलार ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ (केंद्रीय व जिल्हा समिती) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ४ ऑक्टोबर रोजी (रविवारी) सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रेशिमबाग, उमरेड रोड येथील जैन कलार समाजाच्या सभागृहात हे शिबिर होणार आहे. श्रावण रामटेककर आणि देवकाबाई रामटेककर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बदललेला आहार, वाढता मानसिक ताण आणि व्यायामाचा अभाव यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा आजाराची लक्षणे दिसूनही वेळेवर तपासणी होत नसल्याने आरोग्याच्या समस्या गंभीर होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन समाजातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटांतील नागरिकांना आरोग्य तपासणीची संधी उपलब्ध करून देण्याचा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी या महाआरोग्य शिबिरात विविध वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करण्यात येणार आहेत. हृदयरोग, कर्करोग, यकृतरोग, छाती व श्वसनविकार, त्वचारोग, अस्थिरोग तसेच नाक, कान आणि घशाच्या आजारांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ईसीजी, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबीन आणि डोळ्यांची तपासणी पूर्णपणे निःशुल्क करण्यात येणार आहे. विविध तपासण्यांमुळे नागरिकांना आपल्या आरोग्याविषयी प्राथमिक माहिती मिळण्यास मदत होणार असून, आवश्यकते नुसार पुढील उपचारांसाठी योग्य मार्गदर्शनही मिळू शकणार आहे. मोफत औषधे, चष्मे आणि शासकीय योजनांची माहिती आरोग्य तपासणी बरोबरच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकते नुसार चष्म्यांचेही निःशुल्क वितरण केले जाणार आहे. यामुळे आर्थिक अडचणींमुळे आरोग्य सुविधांपासून दूर राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होईल. शिबिरात शासकीय विभागाच्या माध्यमातून आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डविषयी माहिती देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि उपलब्ध आरोग्य सुविधांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे आरोग्य तपासणीसोबतच शासकीय आरोग्य योजनांची माहिती मिळवण्याची संधीही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. सामाजिक बांधिलकीतून आरोग्यसेवेचा उपक्रम जैन कलार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ वैद्यकीय तपासणी पुरता मर्यादित नसून, समाजात आरोग्या विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येत आहे. या महाआरोग्य शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रयास जैन कलार ज्येष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरणजी गोसेवाडे, अध्यक्ष प्रकाश मासुरकर, सचिव विजय समर्थ आणि प्रायोजक त्रिलोक रामटेककर यांनी केले आहे. शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि विश्वस्त नियोजन, व्यवस्थापन तसेच श्रमदानाच्या माध्यमातून परिश्रम घेत आहेत.

Popular Articles