spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विदर्भ आयटी प्रीमियर लीग डे-नाईट क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

– ‘मिस अर्थ इंडिया २०२६’ आर्या अवधूत यांची विशेष उपस्थिती; सेंट मेरी मैदानावर क्रिकेटचा थरार

नागपूर :- क्रीडाप्रेमींसाठी उत्साहाची पर्वणी ठरलेल्या विदर्भ आयटी प्रीमियर लीग डे- नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ३ व ४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील सेंट मेरी मैदानावर करण्यात आले. या स्पर्धेत क्रिकेटचा थरार, खेळाडूंचे उत्कृष्ट कौशल्य आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दिवस- रात्र खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेने क्रिकेट प्रेमींना रोमांचक सामन्यांची पर्वणी अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे ‘मिस अर्थ इंडिया २०२६’ आर्या अवधूत यांची विशेष अतिथी म्हणून लाभलेली उपस्थिती. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेच्या उत्साहात आणखी भर पडली. क्रीडा आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या आयोजनामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळाली. विदर्भातील आयटी क्षेत्रातील तसेच इतर क्रिकेटप्रेमी खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील क्रीडा भावना वाढविणे आणि क्रिकेटच्या माध्यमातून परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध दृढ करणे, हा या स्पर्धेच्या आयोजना मागील उद्देश होता. खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळावी, तसेच स्थानिक पातळीवर क्रिकेटला प्रोत्साहन मिळावे, या दृष्टिकोनातून आयोजकांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून सॅमसंग कंपनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच विदर्भ व मध्य प्रदेशचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक रितेश विलायतकर यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले. प्रायोजकांचे सहकार्य आणि आयोजकांचे नियोजन यामुळे स्पर्धेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. डे- नाईट स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत दिवसा आणि रात्रीच्या प्रकाशझोतात क्रिकेटचा आनंद अनुभवण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळाली. मैदानावर खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट फलंदाजी, प्रभावी गोलंदाजी आणि चुरशीच्या सामन्यांमुळे स्पर्धेत रंगत निर्माण झाली. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी विजयासाठी केलेले प्रयत्न आणि दाखविलेली जिद्द यामुळे उपस्थित प्रेक्षकांचा उत्साह कायम राहिला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कमिटी मेंबर अभिषेक रेंघे, राहुल शर्मा, मंगू सिंह, दिनेश सिंह, गणेश सोनटक्के, नरेश झाडे, पंकज रडके, युवराज ठवकर, सत्कार मांडवगडे आणि प्रणय घुघरे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष आयोजनापर्यंत सर्वांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आयोजकांनी स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली होती. मैदानाची व्यवस्था, सामन्यांचे नियोजन आणि खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा यांवर विशेष लक्ष देण्यात आले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही स्पर्धा क्रीडा प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. विदर्भ आयटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्थानिक क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळण्या सोबतच नागपूरच्या क्रीडा संस्कृतीला नवी ऊर्जा मिळाली. क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येण्याची संधी मिळाल्याने खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. क्रिकेट ‘प्रेमी तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या स्पर्धेचे आयोजन यशस्वी ठरले. भविष्यात अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकाधिक खेळाडूंना संधी मिळावी आणि नागपूरसह विदर्भात क्रिकेटचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Popular Articles