– निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी जागेवरच सुटणार
– आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना ई-पीपीओ प्रणालीबाबत मार्गदर्शन
गडचिरोली :- जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या अडचणींचे निरसन करण्यासाठी मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पेंशन अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, समाजकल्याण कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे होणार आहे.
महालेखापाल कार्यालय, नागपूर यांच्यामार्फत आयोजित या पेंशन अदालतीत निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनविषयक प्रलंबित अडचणी, समस्या व तक्रारींवर चर्चा करून त्यांच्या निरसनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधितांना महालेखापाल कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर आपल्या अडचणी मांडण्याची आणि शंकांचे समाधान करून घेण्याची संधी मिळणार आहे.
याच कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेत जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना ई-पीपीओ (इलेक्ट्रॉनिक निवृत्तीवेतन प्रदान आदेश) प्रणालीच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीचा वापर आणि त्यासंबंधीच्या कार्यपद्धतीची माहिती महालेखापाल कार्यालयातील तज्ज्ञ अधिकारी देणार आहेत. या प्रणालींबाबत अधिकाऱ्यांच्या शंकांचेही निरसन करण्यात येणार आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या निवृत्तीवेतनविषयक अडचणी व शंका मांडाव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कार्यशाळेस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी गेडाम यांनी केले आहे.








