हंसराज,भंडारा पवनी :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पवनी तालुक्याच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथील गांधी भवन येथे दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी तालुक्यातील अनेक युवकांनी शिवबंधन बांधून पक्षात जाहीर प्रवेश केला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना भंडारा-गोंदिया लोकसभा संपर्कप्रमुख राजू पाटील यांनी, “शिवसेना ‘८०% समाजकारण आणि २०% राजकारण’ या मूलमंत्रावर कार्यरत आहे,” असे सांगत पक्षाच्या बीएलए (BLA) व पदाधिकाऱ्यांनी मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत सतर्क राहून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर राजू पाटील, जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, विधानसभा संपर्कप्रमुख राजू नाईक, महेश पाटील, जिल्हा संघटक लवकुश निर्वाण, सुधाकर कारेमोरे, करुणा शिंदे, श्रीकांत मेश्राम व रश्मी पातुरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, तालुकाप्रमुख दिनेश नंदपुरे, शहरप्रमुख अरविंद अंबादे, उपशहरप्रमुख शारिक शेख यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शहरातील व तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








