– नगर परिषद प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
हंसराज, भंडारा :- भंडारा शहरात विकासाच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्यांची गेल्या तीन-चार वर्षांपासून कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्यामुळे प्रमुख मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आठवडाभरात हे खड्डे कायमस्वरूपी न बुजवल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, राजीव गांधी चौक ते पांडे महाल, मुस्लीम लायब्ररी चौक, खात रोडला जोडणारी ट्युशन गल्ली तसेच अण्णाभाऊ साठे चौक ते शीतला माता मंदिर रोडवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. ट्युशन गल्लीत तर चार फूट लांब व एक फूट खोल खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू आहे. प्रशासनाने तात्पुरती गिट्टी टाकल्याने दुचाकी घसरून अनेक नागरिक जखमी व कायमचे अपंग झाले आहेत; अनेकांना मणक्याचे आजार जडले असून रस्त्यावरील धुळीमुळे श्वसनाचे विकार बळावले आहेत.
नागरिकांकडून नियमित कर वसूल करूनही सुविधा न देणे हा प्रशासनाचा नाकर्तेपणा असल्याचा आरोप करत, आठ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
या निवेदनाची प्रत मुख्याधिकाऱ्यांनाही सोपवण्यात आली. हे निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक प्रशांत देशमुख, मयूर जोशी, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, राजेश ठवकर, प्रकाश निनावे, अनिरुद्ध गाढवे, सोमेश्वर सेलोकर, हिमांशू भाजीपाले, शामराव मालखंडाळे, संतोष चांदेवार, नितेश गभणे, अथर्व समर्थ, मोनू हेडाऊ, रोशन मेश्राम आदी उपस्थित होते.








