– विविध मान्यवरांची उपस्थिती; उर्मिला वानखेडे यांची महिला सेलच्या जिल्हा महासचिवपदी नियुक्ती
हंसराज, भंडारा :- येथील ऑफिसर्स क्लब येथे लोक जनशक्ती पार्टी (लोजपा), भंडाराच्या वतीने पक्षाचे संस्थापक स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पासवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. रामविलास पासवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. लोजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी पासवान यांच्या सामाजिक व राजकीय जीवनकार्यावर प्रकाश टाकून कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोकशाहीर अंबादासजी नागदेवे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर खोब्रागडे आणि युगांतर बारसागडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महासचिव राजेंद्र लांजेवार यांनी केले, तर आभार भंडारा शहराध्यक्ष मुस्ताक भाई पठाण यांनी मानले.
याच कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव असणाऱ्या उर्मिला आर. वानखेडे यांची लोजपा (महिला प्रकोष्ठ/सेल) भंडारा जिल्हा महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








