हंसराज,जवाहरनगर :- गोवंश जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, अत्यंत निर्दयतेने व क्रूरपणे आखूड दोरीने बांधून कत्तलीच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या एका इसमावर जवाहरनगर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख २९ हजार रुपये किमतीच्या १३ गोवंश जनावरांची सुटका केली असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस स्टेशन जवाहरनगर अंतर्गत मौजा नांदोरा टोली (ता. जि. भंडारा) येथे जनावरांना डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा यांनी पथकासह नांदोरा टोली येथे छापा टाकला. त्यावेळी आरोपी नागे आशिष उर्फ गुड्डू ज्ञानेश्वर वंजारी (वय ३२, रा. नांदोरा टोली, ता. जि. भंडारा) याने जनावरांना चारा-पाणी न देता, कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करण्यासाठी अतिशय निर्दयतेने बांधून ठेवल्याचे मिळून आले. या छाप्यात पोलिसांनी प्रत्येकी १० हजार रुपये किमतीची ६ जनावरे (६०,००० रु.), प्रत्येकी १५ हजार रुपये किमतीची ३ जनावरे (४५,००० रु.) आणि प्रत्येकी ६ हजार रुपये किमतीची ४ जनावरे (२४,००० रु.) अशी एकूण १ लाख २९ हजार रुपये किमतीची १३ गोवंश जनावरे ताब्यात घेऊन जप्त केली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात अप.क्र. ४३६/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम ५, ५ (ए), ५ (ब), प्राणी छळ प्रतिबंधक कायदा सहकलम ११ (१) (च) (ज) (झ) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश गोरे, पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा, पोलीस हवालदार शिंगाडे व पोलीस शिपाई तिडके यांनी केली असून, घटनेचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करत आहेत.








