spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आधुनिक कोळंबी प्रक्रिया उद्योगांची मत्स्यव्यवसाय नितेश राणे मंत्री यांच्याकडून पाहणी

– निर्यातक्षम समुद्री उत्पादनांच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास

– जगदीश मरीन एक्सपोर्ट्स आणि मौर्य ॲक्वेक्स प्रकल्पांना भेट

मुंबई :- महाराष्ट्रातील समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योग अधिक सक्षम करून मूल्यवर्धित व निर्यातक्षम उत्पादनांना चालना देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील रायालम-भीमावरम येथील जगदीश मरीन एक्सपोर्ट्स आणि मौर्य ॲक्वेक्स या कोळंबी प्रक्रिया उद्योगांची पाहणी केली. आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान, शीतसाखळी आणि निर्यात व्यवस्थापनाचा त्यांनी आढावा घेतला.

मत्स्यव्यवसाय अभ्यास दौऱ्या अंतर्गत मंत्री राणे यांनी मोठ्या प्रमाणावरील कोळंबी प्रक्रिया, निर्यातक्षम उत्पादनांची निर्मिती आणि समुद्री खाद्यपदार्थांचे मूल्यवर्धन यांची माहिती घेतली. कच्च्या मालाची हाताळणी, कोळंबीची प्रतवारी, सोलणे व स्वच्छता तसेच उत्पादनांची गुणवत्ता टिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानयाबाबतही पाहणी केली.

कोळंबी गोठवण्यासाठी वापरण्यात येणारे आयक्यूएफ आणि ब्लॉक फ्रीझिंग तंत्रज्ञान, शिजवलेली व ब्लँच केलेली उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया, शीतसाखळी व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत समुद्री खाद्यपदार्थांच्या निर्यातीसाठी आवश्यक गुणवत्ता मानके आणि उत्पादन सुरक्षिततेशी संबंधित प्रक्रियांचीही त्यांनी माहिती घेतली.

आधुनिक प्रक्रिया सुविधा, उत्पादनांचे विविधीकरण, उत्पादनांचा मागोवा घेणारी यंत्रणा आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन याबाबत या भेटीतून महत्वपूर्ण माहिती मिळाली. या अनुभवाचा उपयोग महाराष्ट्रातील समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योगाची क्षमता वाढवण्यासाठी होऊ शकतो. कोळंबीसह विविध समुद्री उत्पादनांचे मूल्यवर्धन, निर्यातक्षम उत्पादनांची निर्मिती आणि जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. प्रक्रिया उद्योगांच्या विस्तारामुळे मच्छीमारांसाठी बाजारपेठेच्या संधी वाढण्यासह रोजगारनिर्मिती आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळू शकेल अशी माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

Popular Articles