spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विकासकामांच्या नावाखाली झाडांवर कुऱ्हाड; शिवाजी स्टेडियमवरील संशयास्पद वृक्षतोडीची चौकशी करा!

■ दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी; विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

■ परवानगीची कागदपत्रे तपासून पंचनामा करा; अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

हंसराज, भंडारा :- भंडारा शहरातील शिवाजी स्टेडियम परिसरात विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जुन्या झाडांची तोड करण्यात आल्याचा आरोप करीत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे विविध उपक्रम राबविले जात असताना, दुसरीकडे विकासकामांच्या नावाखाली मोठ्या व जुन्या झाडांची तोड होत असल्याबाबत समितीने चिंता व्यक्त केली आहे. भंडारा जिल्हा क्रीडा विभागाशी संबंधित शिवाजी स्टेडियम येथील वृक्षतोडीच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

समितीचे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष मुकेश कुमार यांनी या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. स्टेडियम परिसरातील विकासकामांसाठी संबंधित क्रीडा अधिकारी व विभागामार्फत खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या कामादरम्यान मोठ्या व जुन्या झाडांची तोड करण्यापूर्वी आवश्यक वैधानिक परवानगी घेण्यात आली होती का, असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील लागू वृक्षसंवर्धनविषयक कायदे व नियमांनुसार संबंधित प्रकरणाची तपासणी करून वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या किंवा नाही, याची खातरजमा करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे.

तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या, प्रजाती आणि सद्यस्थिती यांची नोंद घेऊन पंचनामा करावा. तसेच संबंधित परवानगीची कागदपत्रे तपासून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास जबाबदार अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि अन्य दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

विकासकामे आवश्यक असली, तरी त्यासाठी पर्यावरणाची हानी होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. मोठ्या व जुन्या झाडांची तोड करण्याऐवजी शक्य असेल तेथे त्यांचे संरक्षण आणि पुनर्रोपण करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात नियमानुसार पर्यायी वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन सुनिश्चित करावे, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

शिवाजी स्टेडियम परिसरातील वृक्षतोडीच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

या वेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष मुकेश कुमार ,भंडारा जिल्हाध्यक्ष विजय नवघरे, भंडारा तालुकाध्यक्ष भाऊराव बनसोड, कोअर कमिटी सदस्य भगवान जंजाळ, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष कृष्णा गुन्हेवार, माजी जिल्हाध्यक्ष देविदास लांजेवार, सदस्य विष्णुदास लोणारे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles