spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री साहेब ५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?

– मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांचा सवाल !

– तुटपुंजी अग्रीम मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका ! 

– संत्रा उत्पादकांना भरीव आर्थिक मदत देण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये अग्रीम रक्कम जमा होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे वृत्त समोर येत असताना, या मदतीच्या रकमेवरून शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे उत्पादन खर्चात मोठी वाढ, दुसरीकडे पावसाची अनिश्चितता, भीषण पाणीटंचाई, वाढती महागाई आणि पिकांचे नुकसान अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी अवघ्या पाच हजार रुपयांत कशी गोड होणार, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी उपस्थित केला आहे.

मोर्शी–वरूड तालुका हा विदर्भातील प्रमुख संत्रा उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा प्रतिकूल हवामान, पावसातील खंड, सिंचनासाठी अपुरा वीजपुरवठा आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. संत्रा बाग जगवण्यासाठी खते, औषधे, मजुरी, ठिबक सिंचन आणि पाण्याची व्यवस्था यावर हजारो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या एकूण नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याची भावना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाकडून व्यक्त होत आहे.

विशेषतः मोर्शी–वरूड परिसरातील संत्रा उत्पादकांसाठी स्वतंत्र मदत पॅकेज जाहीर करणे, गारपीट व अतिवृष्टीची प्रलंबित रक्कम तातडीने वितरित करणे, शेतीसाठी नियमित दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आणि पाणीटंचाईच्या संकटातून बागा वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दिवाळी गोड करण्यासाठी केवळ पाच हजार रुपयांची घोषणा पुरेशी नाही; शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करून, नुकसानभरपाई देऊन आणि शेतीला आर्थिक स्थैर्य देऊनच त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होईल. शासनाने शेतकऱ्यांच्या या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पाच हजार रुपयांत दिवाळीचा खर्च तरी कसा भागणार?

सणासुदीच्या काळात घरखर्च, किराणा, मुलांचे शिक्षण, कपडे, औषधोपचार आणि शेतीवरील थकित खर्च अशा अनेक जबाबदाऱ्या शेतकऱ्यांसमोर आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले असून, काही शेतकऱ्यांना बाग जगवण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. अशा वेळी केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सुटणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करून दाखवावी, म्हणजे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींची खरी जाणीव होईल,” अशा शब्दांत शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

घोषणा नको, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा द्या!

शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणे महत्त्वाचे असले, तरी मदत किती आहे आणि ती शेतकऱ्यांच्या गरजांसाठी कितपत पुरेशी आहे, याचाही शासनाने विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन त्यांच्या अपेक्षांची पूर्तता झाल्याचे मानता येणार नाही, अशी भूमिका शेतकरी वर्गातून मांडली जात आहे.

Popular Articles