spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीक विविधीकरणातून तेलबिया व कडधान्य लागवडीकडे वळावे : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

– राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

गडचिरोली :- जिल्ह्यात भात पिकाचे प्राबल्य लक्षात घेता शेतकऱ्यांनी पीक विविधीकरण करून तेलबिया व कडधान्य पिकांच्या लागवडीकडे वळावे. पाण्याची उपलब्धता आणि हवामानातील अनिश्चितता विचारात घेऊन हवामानानुकूल शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत १३ ऑक्टोबर रोजी आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तेलबिया पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविणे तसेच पेरणीपासून काढणीपश्चात व्यवस्थापनापर्यंतचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी प्रास्ताविकातून रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या नियोजनाची माहिती दिली. शेतकऱ्यांनी करडई, तीळ, जवस, मोहरी व भुईमूग यांसारख्या तेलबिया पिकांची लागवड करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेत जितेंद्र गभने यांनी तेलबिया पिकांची लागवड व शून्य मशागत पद्धतीने मोहरी पेरणीबाबत मार्गदर्शन केले. दिभणा येथील विलास जेंगठे यांनी तेलबिया पिकांचे महत्त्व व जवसाच्या उपयोगांविषयी माहिती दिली. कुरखेडा तालुक्यातील चीचेवाडा येथील अजय मडावी यांनी जैविक व नैसर्गिक शेतीबाबत, तर अहेरी तालुक्यातील महागाव येथील विठोबाजी बोरीले यांनी तीळ व भाजीपाला लागवडीतील अनुभव सांगितले.

शंकरपूर येथील शिवकृपा ऑईल मिलचे संचालक तिलक करकाडे यांनी तेलबिया प्रक्रिया, पूरक व्यवसाय म्हणून तेलगिरणी आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळविण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी धान पिकाची सद्यस्थितीतील काळजी, तेलबिया लागवडीतील खबरदारी आणि उत्पादकता वाढविण्याच्या उपायांची माहिती दिली.

कार्यशाळेला शेतकरी, कृषी सखी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, शेतकरी गटांचे सदस्य तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कृषी उपसंचालक मधुगंधा जुलमे यांनी आभार मानले.

Popular Articles