spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करा – डॉ. विपीन

– मनपा आयुक्तांनी केली “नंदग्राम” प्रकल्पाची पाहणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मौजा वाठोडा स्थित नंदग्राम (गोठा) प्रकल्पाची मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी पाहणी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, राजेंद्र राठोड, घन कचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ.गजेंद्र महल्ले, उपअभियंता राजीव गौतम इतर अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी यावेळी मासोळी बाजार प्रकल्पाच्या विकास कामांची देखील पाहणी केली.

यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत अग्निशमन व्यवस्था, विद्युत सुविधा, पाणीपुरवठा, सुरक्षा तसेच प्रकल्पाचे संचालन व देखभालीसंदर्भातील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नंदग्राम प्रकल्पातील उर्वरित ५ टक्के स्थापत्य कामे संबंधित कंत्राटदारामार्फत प्राधान्याने पूर्ण करून घेण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले. याशिवाय प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेले अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधून कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले.

प्रकल्पातील विद्युत उपकरणे व साहित्याचे औपचारिक हस्तांतरण होईपर्यंत त्यांचे योग्य संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराने पार पाडावी, गोठ्यांच्या स्वच्छतेसाठी पिण्यायोग्य पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले. आवश्यकतेनुसार एसटीपी अथवा अन्य उपलब्ध स्रोतांमधून प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून देण्याबाबतही कार्यवाही करावी, निराधार व बेवारस जनावरांच्या व्यवस्थापनासाठी किमान तीन गोठे राखीव ठेवून अंदाजे ७५ जनावरांची क्षमता उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक नियोजन करावे, प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची व्यवहार्यता तपासून घ्यावी, प्रकल्पाची अंदाजित एकूण विद्युत मागणी सुमारे ३०० किलोवॅट असल्याने प्रस्तावित २०० किलोवॅट सौरऊर्जा क्षमतेमध्ये आवश्यक वाढ करण्याच्या दृष्टीने तांत्रिक बाबी तपासून सुधारित प्रस्ताव सादर करवा. तसेच सौरऊर्जा पॅनेल गोठ्यांच्या छतावर बसविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. जनावरांच्या शेणाचा योग्य विनियोग करण्यासाठी लघु बायोगॅस प्रकल्प उभारण्याची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश ही यावेळी दिले.

प्रकल्पाच्या संपूर्ण सुविधेच्या अथवा निवडक घटकांच्या संचालन व देखभालीसाठी इच्छुक व पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्याच्या दृष्टीने ईओआय तयार करण्याची कार्यवाही घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

Popular Articles