खापा, वार्ताहर :- नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला सांस्कृतिक रंगत देणारा ‘भव्य सारंग गरबा, खापा २०२६’ हा महोत्सव तान्या सेलिब्रेशन लॉन व हॉल येथे उत्साहात पार पडला. मेघा बागडे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सुमारे ४०० पेक्षा जास्त महिलांनी गरबा नृत्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
महोत्सवाचे उद्घाटन अंकिता पियूष बुरडे आणि खापा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पियूष राजेंद्र बुरडे यांच्या हस्ते करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, गरब्याच्या तालावर थिरकणाऱ्या महिला आणि नृत्याचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारून गेला.

कार्यक्रमाला खापा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत काळे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सुनील पाहुणे, नगरसेविका निशा कठोते आणि नगरसेवक निखिल आष्टणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिलांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पारंपरिक नृत्यकलेचे जतन करणे आणि महिलांमध्ये एकोपा वाढविणे हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश होता. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गरबा महोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मेघा बागडे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक केले.
महिला शक्तीचा उत्साह, पारंपरिक संस्कृतीचा सन्मान आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा गरबा महोत्सव खापानगरीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.








